॥ श्रीविष्णू आरती ॥

आरती आरती करूं गोपाळा । मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ ध्रु० ॥

आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें । भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥

अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें । जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ॥ आरती० ॥ १ ॥

रमावल्लभदासें अहंधूप जाळिला । एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥

सोहं हा दीप ओंवाळूं गोविंदा । समाधी लागली पाहतां मुखारविंदा ॥ आरती० ॥ २ ॥

हरिखें हरीख होतो मुख पाहतां । प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥

सद्भावालागीं बहु हा देव भूकेला । रमावल्लभदासें अहं नैवेद्य अर्पिला ॥ आरती० ॥ ३ ॥

फल तांबूल दक्षिणा अर्पिली । तया उपरी नीरांजनें मांडिलीं ॥

पंचप्राण पंचज्योति आरति उजळली । विश्व हें लोपलें तया प्रकाशातळीं ॥ आरती० ॥ ४ ॥

आरतीप्रकाशें चंद्रसूर्य लोपले । सुरवर नभीं तेथें तटस्थ ठेले ॥

देवभक्तपण न दिसे कांहीं । ऐशापरी दास रमावल्लभा पायीं ॥ आरती० ॥ ५ ॥

 

 

नारायण खगवाहन चतुराननताता । स्मर‍अरितापविमोचन पयनिधिजामाता ॥

वैकुंठाधिपते तव महिमा मुखिं गातां । सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय लक्ष्मीकांता । मंगल आरति करितों भावें सुजनहिता ॥ ध्रु० ॥

सदैव लालन पालन विश्वाचें करिसी । दासांस्तव तूं नाना अवतार धरिसी ॥

दुष्टां मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी । निशिदिनीं षण्मुखतातातें हृदयीं स्मरसी ॥ जय० ॥ २ ॥

चपला सहस्त्र जयाच्या जडल्या वसनासीं । कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥

कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी । ज्यातें हृदयीं ध्यातां भवभय अघ नाशी ॥ जय० ॥ ३ ॥

तारीं वारीं संकट मारी षड्रिपुला । स्मरती त्यांतें देइं संपत्ती विपुला ॥

तापत्रय जाळितसे निशिदिनिं मम वपुला । दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥ ४ ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.