॥ गुढीपाडव्याचे महत्त्व ॥

चैत्र महिना ह मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे.

परंपरा जुनी म्हणजे किती तर असं सांगतात की त्या ब्रह्मदेवानं जेव्ह ही सकल सृष्टी निर्माण केली. त्या वस्तू मात्रांचा कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी लावायची. प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी सकल अयोध्यावासियांनी गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.

ह्या चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीचं अवलोकन केलं तर असं लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीनं फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नव चैतन्याचं, नव सृष्टीचं स्वागत दारी गुढी लावून करायचं हा पण त्या मागचा एक उद्देश आहे.

गुढी पाडव्याविषयी असलेल्या आख्यायीका:

शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या जातात. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन नृपशक सुरू झाला. म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निजीर्व झालेल्या समाजामध्ये त्याने चैतन्य निर्माण केले असावे. समाजात स्वाभिमान, अस्मिता जागृत केली असावी.

दुसर्‍या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रीत्यर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. या वषीर् शालिवाहन शक १९३० चा प्रारंभ होत आहे. ज्यांनी विजय मिळविला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ यामध्ये करण्यात येतो.

वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.

भगवान श्री विष्णूंनी प्रभु रामचंदाचा अवतार घेऊन रावणासह दुष्ट राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारले. त्यानंतर प्रभु रामचंदानी चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरणे उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.

गुढीपाडवा असा साजरा करावा!

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

निम्बस्तिक्त : कटू : पाकेलघु : शीतोह्यग्नि-वात-कृत।
ग्राही हृद्यो जयेत् पित्त-कफ-मेह-ज्वर-कृतीन्।।
कुष्ठ-कासारूपी हल्लास-श्ववथु-व्रणात्।
भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर (ताप) मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. अति कडूनिंब सेवन आरोग्यास अपायकारक असते. जंतुनाशक म्हणूनही कडूनिंब उपयुक्त आहे.

आता गुढी कशी तयार करायची?

तर एक उंच काठी घ्यायची. त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी ह्या वस्तू बांधायच्या. त्यावर तांब्या-पितळ्याच्या नाहीतर कास्याचा गडू लावायचा.

ही तयार केलेले गुढी दारांत लावायची. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढावी. गुढीची काठी तिथे नीट बांधावी. काठीला गंध, फुलं, अक्षता लावाव्यात. गुढीची पूजा करावी. निरांजन लावावे. उदबत्ती दाखवावी. दुध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवावा.

दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हां हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची आपल्याकडे प्रथा आहे.

गुढी पाडव्याचे दिवशी वर्षारंभ होतो म्हणून त्या दिवशी पंचांग पूजन करून त्यातील नव संवत्सर फल वाचले जाते. चैत्र प्रतिपदा ह दिवस साडेतीन मुहुर्तातला एक म्हणून ह्या दिवसाला महत्त्व आहे. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ इ. गोष्टी केल्या जातात. सुवर्ण खरेदी हा त्यातलाच एक भाग.

आणि बरं का मुलांनो! त्या दिवशी आई, आजी-आजोबा हे तुम्हाला कडुलिंबाची पानं खायला लावतात. त्या मागच शास्त्रीय कारण असं की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत.

॥ महाराष्ट्रातील संत ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.