हल्ली गुढीपाडवा साजरा करू नये अशी चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा दाखला देऊन समाजामध्ये तेढ उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संभाजी महाराजांचा मृत्यू 1689 मध्ये झाला पण गुढीपाडवा त्याआधीही साजरा केला जायचा याचे कित्येक पुरावे आहेत,
स्वतः बानूगडे पाटील यांनीही कबुली दिलीय की चुकीची माहिती त्यांनी सांगितली नसून त्यांच्या नावाखाली कोणीतरी अफवा पसरवत आहे,
मुद्दामहून यादिवशी संभाजी महाराजांचे शीर भाल्याला लटकावले असेलही पण याचा अर्थ असा होत नाही कि, त्याआधी गुढीपाडवा साजरा केला जात नव्हता.
गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे.
काठी पुजा ही फक्त आपल्याच संस्कृतीमध्ये नाही तर सायबेरिया, दक्षिण आफ्रिका, म्यानमार, व्हिएतनाम, कोरिया, नेपाळ आणि युरोपमध्ये हि करत असल्याचा पुरावा आहे.
भारतामध्ये पण त्रिपुरा, मणिपूर, मध्यप्रदेश आणि ओरिसा मध्ये सुद्धा काठीची पूजा वेगवेगळ्या सणामध्ये केली जाते.
वसंत ऋतूच्या सुरुवातीला साखर, गुळ आणि कडुलिंबाची पाने खाल्याने पित्ताचा नाश होतो आणि पचन संस्था सुधारते.
गुढीविषयी पसरवले जाणारे गैरसमज आणि त्यांचा खरा अर्थ,
१. काठी
गैरसमज : काठी ही प्रेतयात्रेसाठी वापरतात तर तिचा वापर करू नये.
खरा अर्थ : काठीची पुजा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील आणि विदेशातील अनेक संस्कृती मध्ये केली जाते. शिवाय अनेक देवांच्या कावडी या पण काठीच्याच असतात मग ते पण बंद करणार का ?
२. कलश
गैरसमज : तांब्या उलटा ठेवू नये, ते अशुभ असतं
खरा अर्थ : एकतर काठीवर तांब्या सुलट ठेऊ शकत नाही, कारण तसा तो राहणार नाही, आणि त्याचे खरे प्रयोजन म्हणजे, दिवसभर गुढीला लावलेला उलट तांब्या हे श्री यंत्रासारखे कार्य करते, जे वातावरणातील शुभ शक्ती एकवटुन आपल्यात घेते.
याच शास्त्रशुद्ध कारणा मुळे मंदिराचे कळस, कैलास पर्वत आणि श्री यंत्राला त्या प्रकारचा आकार देण्यात आलेला आहे. गुढीवर उलटा ठेवलेला कलश हे मंदिराच्या कळसासारखे कार्य करते.
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू १६८९ मध्ये झाला
गुढीपाडव्याचे १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया –
१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे.
म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.
२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा –
“शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात.”
म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.
३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात-
“ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”
अर्थात “राम आल्यावर गुढ्या” इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.
४) महाभारताच्या आदिपर्वात(१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसर्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली.या परंंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून,ती शृंगारून,पुष्पमाला बांंधून तिची पूजा करतात.
५) संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात.
६) संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात.
७) संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥"
८) १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो.
त्यामुळे तुम्ही नवीन अफवांना बळी न पडता गुढीपाडवा हा सण नेहमीच्या पद्धतीने गुढ्या उभारूनच साजरा करावा.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाखाली समाजामध्ये तेढ पसरवणाऱ्या लोकांना गुढीपाडव्याचे खरे महत्व सांगावे.
हा मजकूर जास्तीत जास्त लोकांना पाठवून समाज प्रबोधन करूया आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण करूयात.