॥ कीर्तन ॥

वारीच्या कार्यक्रमात कीर्तने होत असतात. श्रोत्यांच्या मनांत भक्तिरसाचा परिपोष करणे, तसेच संप्रदायाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे महत्त्वाचे हेतू आहेत. थोर संत आणि वारकरी नामदेव हे आद्य कीर्तनकार मानले जातात. ' नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ' ही नामदेवांची भूमिका होती. भजनकीर्तनांच्या योगे विठ्ठलाची किर्ती त्यांनी भारतात अनेक ठिकाणी हिंडून पोहोचविली. सु.५४ वर्षे ते पंथप्रचारासाठी झटले. पंजाबात तर अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. नामदेवांनी हिंदी भाषेत रचले ली ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत.

वारकरी कीर्तन हरिदासी कीर्तनापेक्षा वेगळे असते. त्यात गाण्यापेक्षा भजनावर अधिक भर असतो. वारकरी कीर्तनाचीही पुर्वीची पद्धत आणि आजची पद्धत ह्यांत थोडा फरक आहे. राउळात जाऊन विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर देवाला पाठ न दाखविता भजन करीत मागेमागे जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात यायचे आणि मग कीर्तनास आरंभ करायचा, ही जुनी पद्धत होती. वारकरी संप्रदायातील विख्यात कीर्तनकार विष्णुबुवा जोग ह्यांनी ही पद्धत बदलली, कारण अशी कीर्तनपद्धती गावोगावी अवलंबिणे शक्य नव्हते. वारकरी कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तर रंग, असे दोन भाग विष्णुबुवा जोगांनीच केले. मुळात वारकरी कीर्तने नदीच्या वाळवंटात होत, ह्याचे पुरावे संतांच्या अभंगांतून मिळतात. कीर्तनात निरूपण असल्यामुळे त्या कीर्तनास कीर्तन म्हणण्याऐवजी निरूपण म्हणण्याची पद्धत वारकरी संप्रदायात आहे.

वारकरी कीर्तन प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी मृदंगाच्या साथीवर टाळकऱ्यांचे भजन चालू असते. हातात वीणा घेतलेला  एक वारकरी  निरनिराळ्या संतांचे अभंग सांगतो आणि इतर ते म्हणतात. कीर्तनकार बुवा आल्यानंतर ते वीणेकऱ्याला व श्रोत्यांना नमस्कार करून वीणा स्वतःच्या गळ्यात घालतात. नंतर 'जयजय रामकृष्ण हरी'  च्या घोषात कीर्तन चालू होते. नमनाला ज्ञानदेवांचा 'रूप पाहतां लोचनी। सुख जालें वो साजणी' हा किंवा संत तुकारामांचा 'सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी' हा अभंग घेतात. त्यानंतर निरूपणाचा अभंग सुरू होतो. ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत झालेल्या संतांचेच अभंग निरूपणासाठी घ्यायचे, असा दंडक आहे. तथापि संत रामदासांचे अभंग निरूपणासाठी कधीही घेतले जात नाहीत. त्याचप्रमाणे जेथे कीर्तन करायचे, तेथे अन्न घ्यायचे नाही, असाही दंडक आहे.
 
निरूपणाचा अभंग म्हणून झाल्यानंतर एखादा वारकरी बुवांच्या सांगण्यावरून तोच अभंग रागदारीत गातो. हे अभंगगायन चालू असताना कीर्तनकार बुवांनी आरंभी ज्याच्या हातून वीणा घेतलेली असते, तो वीणेकरी बुवांच्या हातून वीणा घेऊन आपल्या गळ्यात घालतो. कीर्तनाच्या गादीचा मान म्हणून वीणा देताघेताना  बुवा व वीणेकरी एकमेकांच्या पाया पडतात. वारकरी कीर्तनात वीणेचे महत्व विशेष आहे. भजन संपल्यानंतर 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' असा घोष करतात. शेवटी निरूपणाच्या अभंगाचा भावार्थ बुवा सांगतात. येथे कीर्तनाचा पूर्वरंग संपतो.

उत्तररंगात निरूपणाच्या अभंगाचे सखोल आणि सविस्तर विवेचन केले जाते. नारदीय कीर्तनातील उत्तररंगात  आख्यान लावण्याची पद्धत आहे, तशी ती वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात नाही. सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर आणि बाबामहाराज सातारकर, हे थोर वारकरी कीर्तनकारांपैकी काही होत.

॥ महाराष्ट्रातील संत ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.