जेव्हा अधर्म, अत्याचार, अनिती ह्यांचा कडेलोट होतो, त्यावेळी भगवंत अवतार घेतो. त्यावेळी ही तसंच झालं.
मथुरेचा राजा कंस ह्याच्या अधर्म, अत्याचार, अनितीला जेव्हा प्रजा त्रासली. कंसाने काय केले नाही, त्याने आपली बहिण देवकी आणि तिचा पती वसुदेव ह्यांना बंदीशाळेत टाकले. कां तर तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा तुझा वध करील ही आकाशवाणी त्यानं ऐकली होती. आपला शत्रू जन्मताच नाहिसा करायचा, मारून टाकायचा, म्हणून कंसान देवकीची बाळ मारून आपल्या माथी बाल हत्येच पाप घेतलं. बालकाची निर्घुण हत्या केली, तेव्हा देवकीपोटी आठव्या बालकाच्या रूपाने भगवान महाविष्णू ह्यांनी श्रीकृष्ण रूपाने आठवा अवतार घेतला.
श्रावण वध अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस. श्रीकृष्ण ही भारतीयांची लाडकी देवता. त्यामुळे गोकुळाष्टमी-कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इ. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसर् या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात.
कृष्ण हा भगवान महाविष्णू ह्यांचा आठवा अवतार. त्या अवताराची प्रगटन तिची अष्टमीच. ह्या अवताराच प्रमुख कार्य म्हणजे धर्म रक्षण, भक्त भाविक सज्जन ह्यांच रक्षण अन दुर्जनांना शासन करणं हेच होय. कौरव पांडवाच्या मधलं ते महाभारत घडू नये म्हणून श्रीकृष्णाने खूप प्रयत्न केले, पण अखेर कृष्णाला सत्याच्या बाजूने, धर्माच्या बाजून म्हणजेच पांडवांच्या बाजूनेच युद्धांत उतरावे लागले. पांडवाच्या बाजूने राहून श्रीकृष्णा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. कपटी अन कुटिल कारस्थानी कौरवांचा पराभव केला.
श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोप-गोपींना आपल्या रूपाने आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले. दुष्ट कंसाचा वध केला. कालिया मर्दन केले. गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून इंद्राचे गर्वहरण केले. गोकुळचा हा दही, दूध, लोणी चोरणारा कृष्ण, कधी लोकांचा चित्तचोर झाला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
श्रीकृष्ण चरित्र हा एक स्वतंत्रपणे अभ्यासाचा, अनुकरणाचा विषय आहे. अर्जुनाचे निमित्त करून उभ्या मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांना गीतामृत पाजणारा तो हा कृष्णच. मूठभर पोह्यांसाठी आपल्या मित्राला सुवर्ण नगरी करून देणारा हा कृष्णच. तो असा अर्जुनाचा सखा, मार्गदर्शक तसाच भोळ्या भावड्या भक्ताचा संरक्षक-मार्गदर्शकही. त्या दुष्टांच्या संहारकाची आणि सज्जन भक्त भाविकांच्या संरक्षकाची आपल्याला सदैव आठवण रहावी. तो आठवा श्रीहरी आपण आठवावा म्हणून हा कृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
दुसर् या दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो. नवयुवकांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो.
॥ महाराष्ट्रातील संत ॥
Blogs
-
नागपंचमी
-
गुरुपौर्णिमा
-
गुढीपाडव्याचे महत्त्व