॥ नागपंचमी ॥

श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला नागपंचमी म्हटले जाते. या दिवशी नागाची पुजा केली जाते. फार पुर्वीपासुन आपल्याकडे नागाला देव मानून पुजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रुढ आहे. शेतातील उंदरांचा साप नाश करतात म्हणून सापाला शेतकर्‍याचा मित्र म्हणतात. प्राणी व पक्षी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पुर्वी पासून आहे. म्हणूच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते.

फार वर्षापुर्वी ‘नाग’ वंशाचे लोक रहात होते. नंतर आर्यांचे भारतात आगमन झाले. आर्यं आणि नाग यांच्यात वारंवार भांडणे होत. एकदा अस्तिक ऋषींनी ही भांडणे मिटवली. नाग लोकांनी हा आनंद नाग पुजनाने व्यक्त केला. म्हणून नागपंचमी साजरी केली जाते, अशी एक पुराणात कथा आहे.

नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी आहे की, कृष्ण गायीगुरांसह यमुनेच्या काठावर जात असे. त्या नदीतील कालिया नावाच्या सापाने गोकुळवासी भयभीत झाले होते परंतु श्रीकृष्णाने कालियामर्दन केले आणि त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस श्रावण पंचमीचा होता. तेव्हापासुन नागपंचमीची प्रथा सुरु झाली असेही मानले जाते.

महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस-शिराळे इथं नागपंचमीचा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो. तेथे जिवंत नाग पकडून त्याची पुजा करतात, नागाची वाजतगाजत मिरवणूक काढतात आणि पुजा झाल्यानंतर परत सोडुन देतात. महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो. घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मुर्ती आणून पुजा केली जाते. घरात नागाची पुजा केल्यानंतर त्याचे घरात वास्तव्य राहिल म्हणुन बाहेर जाऊन वारुळाचीसुध्दा पुजा केली जाते. नागोबाची पुजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवद्य दाखवतात.

या दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नांगर देखील फिरवत नाही. या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही. या सणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी खेळतात. झाडाला झोके बांधुन झोके खेळतात. पुर्वी लहान वयातच मुलींची लग्न होत. नववधुंना मोकळेपणाने खेळता यावे, मन मोकळे करता यावे यासाठी पंचमीच्या दिवशी गावाबाहेर झोपाळे बांधण्याची प्रथा आहे.

नागदेवतेबाबतची श्रध्दा आपल्याकडे फार पुर्वीपासुन दिसते. म्हणुनच देवदेवतांसोबत नागाच्या प्रतिमाही दिसतात. आपल्याकडे सापांबद्द्ल बर्‍याच गैरसमजुती आहेत. साप हा मांसाहारी आहे तो दुध पित नाही. सापाला कान नसतात त्यामुळे त्याला ऎकु येत नाही. तो पुंगीच्या आवाजावर नाही तर हलचालींवर डोलतो. सापाला स्मरण शक्ती नाही त्यामुळे त्याला डुख धरणे शक्य नाही. साप हा सरपटणारा भित्रा प्राणी आहे, तो स्वसंरक्षणासाठीच चावा घेतो.

जगभरात सापाच्या एकूण २५०० जाती आहेत त्यातील १५० जातींचे साप विषारी आहेत. भारतात २१६ जातींचे साप आढळतात त्यातील केवळ ५३ विषारी आहेत. नाग (कोब्रा) घोणस, मण्यार हे साप अत्यंत विषारी आहेत.

॥ महाराष्ट्रातील संत ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.