॥ नाथांचे चमत्कार ॥

पितरांस श्राद्धान्न 
एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत: इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.

एकच नाथ दोन ठिकाणी 
पैठणास राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्‍नी नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.

स्पर्शाने झाले दगडाचे परीस 
पैठणास एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परिस होता तो त्यास खूप जपत असे. एकदा त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. परंतु परीस घेवून आपण प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही हे जाणुन नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ भक्‍ताजवळ तो परीस सुरक्षित राहील या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची पूजा करीत होते. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला; तीर्थयात्रा झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले. नाथांनी तो परीस देव्हाऱ्याखाली ठेवून दिला. बऱ्याच दिवसानंतर तो सावकार परीस घेण्यासाठी नाथांकडे आला व परीसाची मागणी केली तेव्हा तो परीस देण्यास नाथांनी उद्धवास सांगितले. परीस काही सापडेना, नाथ म्हणाले कदाचित निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच तो सावकार नाथांना भलतेसलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करुन आपणाजवळ परीस ठेवण्यास दिला मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले, तळात हात घालून ओंजळभर दगडे उचलली व म्हणाले, "तुझा परीस यातुन निवडून घे." त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देवून बाकी सर्व नदीत टाकुन दिले. परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हे ठीक परंतु नाथांच्या स्पर्शानं दगडाचे परीस होतात हे मात्र विशेष.

पत्रावळी खाली पत्रावळी 
नाथांचे पुत्र हरिपंडीत हे विद्‍वान, परंतु नाथांचे संस्कृतातील ज्ञान प्राकृतात सांगणे त्यांना आवडत नसे. यास कंटाळुन ते काशीस निघून गेले. काही वर्षांनी नाथांनी त्यांची समजुत काढुन त्यांस पैठणास आणले. हरिपंडीत नाथांऐवजी प्रवचन करु लागले. श्रोत्यांची संख्या रोजच्यारोज कमी होऊ लागली. नाथांप्रमाणे आपल्यावर लोकांची श्रद्धा नाही हे जाणुन त्यांचा अभिमान कमी होऊ लागला. परंतु तो संपूर्ण निरभिमान व्हावा असे नाथांना वाटे. एका वृद्ध स्त्रीने नवरा हयात असताना सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला होता. परंतु तो काही कारणाने पूर्ण होऊ शकला नव्हता. तो पूर्ण व्हावा असे त्या स्त्रीस वाटे. तिने नाथांच्या प्रवचनात एकवाक्य ऐकले कि, एक ब्रह्मवेत्‍ता जेवू घातल्यास हजारो ब्राह्मणास भोजन घातल्याचे पुण्य मिळते. तिने नाथांनाच जेवणाचे आमंत्रण दिले. त्या स्त्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याचे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने स्वयंपाक सिद्ध केला. नाथांची पत्रावळ मांडली, त्यांना पोटभर जेवू घातले. नाथ जेवण करुन उठले, पत्रावळ तूच उचल असे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने पत्रावळ उचलली, परत येवून पाहतो तर पत्रावळ जशीच्या तशी पुन्हा दुसरी उचलली तिसरी आली तिसरी उचलली चौथी आली, अशा हजार पत्रावळी हरिपंडीताने उचलल्या. त्या स्त्रीस सहस्त्रब्राह्मण भोजन घातल्याचा आनंद झाला व हरिपंडीतासही आपल्या वडीलांची महती कळली, अभिमान नष्ट झाला. पुढे हरिपंडीतांनी नाथांप्रमाणेच पारमार्थिक आचरण ठेवले.

मूकं करोति वाचालं 
गावोबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्याचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणुन रोज दे असा आईजवळ हटट्‍ करीत असत. रोज पुरणपोळी देणे आईला परिस्थितीमुळे शक्य नसल्याने तिने त्यास नाथांकडे पाठविले. हरिपंडीताप्रमाणे गावोबासही सांभाळावे असे नाथांनी गिरिजाबाईस सांगितले. गावोबास नाथांघरी रोज पुरणपोळी मिळु लागली. तो तिथे पडेल ते काम करीत असत. तो थोडा वेडसर होता तरीही नाथांच्या कीर्तनप्रवचनात बसत. त्यास गायत्रीमंत्रही नीट येत नसे. याला नाथांनी मंत्रोपदेश देवू केला तेव्हां "एकनाथ" या शब्दाशिवाय मी दुसरा मंत्र म्हणणार नाही असे त्याने नाथांस सांगितले. नाथांचा भावार्थरामायण नावाचा ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यन्त आल्यावर समाधी घेण्याचे नाथांनी जाहीर केले. श्रोत्यांना वाईट वाटले. श्रीकृष्णदास लोळे नावाचा रामायणकर्ता एकदा नाथांकडे आला होता तेव्हां त्यास युद्धकांडाचे लिखाण संपविण्यासाठी अकरा दिवस हवे होते. तेव्हां नाथांनी त्याचे मरण अकरा दिवस पुढे ढकलले होते याची आठवण करुण देत लोकांनी नाथांना ग्रंथ समाप्त करुन जावे असे विनविले. परंतु नाथांनी सांगितले मी जरी गेलो तरी राहीलेले रामायण गावोबा पूर्ण करील. नाथांनी विनोद केला असे समजुन लोक हसू लागले. परंतु नाथ जे बोलतात ते खरे होणारच नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य गावोबाने नाथांसमोर ४५ वा अध्याय लिहून काढला. नाथनिर्याणानंतर तो ग्रंथ गावोबानेच तडीस नेला नाथांचे लिखाण कोणते व गावोबाचे कोणते हा फरक लक्षात येत नाही एवढी नाथकृपा गावोबावर झाली.

॥ महाराष्ट्रातील संत ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.