॥ पंढरीची वारी ॥

पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक मोटारीने वा आगगाडीसारख्या वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात.

प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच, तथापि ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले हा उल्लेख वर आलाच आहे. संत नामदेवांच्या (१२७० - १३५०) काळातच ही आळंदीवारी सुरू झाली. सासवड, त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर, आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते. त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली गेली आहेत. तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आहेत.

पंढरीची वारी

लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच; परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पंढरपूरला आल्यानंतर सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून श्रीपांडुरंगाचे व पुंडलिकाचे दर्शन घेतात. पंढरपुरात आल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्तराज पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मग गावप्रदक्षिणा होते. उरलेला वेळ भजन-कीर्तनात जातो. इतर तीर्थांच्या तुलनेत पंढरपूरचे एक वैशिष्ट्य, म्हणजे इथे तीर्थोपवास करीत नाहीत, श्राद्ध, मुंडण हेही नाही. आषाढी आणि कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फडावर भजन-कीर्तनांचा कार्यक्रम असतो. रात्री हरिजागर होतो.  प्रत्येक वारकरी आपापल्या फडावर कीर्तनासाठी जात असला, तरी इतर फडांवरचे कीर्तन वा भजन ऐकायला कोणालाच मज्जाव नसतो.

दशमीपासून चतुर्दशीपर्यंत असे कार्यक्रम चालु असतात. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस, पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथे काल्याचा कार्यक्रम असतो. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे. तेथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. सतराव्या शतकात (१६६६) त्याचे बांधकाम सुरू झाले होते. शामजी अनंत नांदिवरेकर व त्यांचे आप्त ह्यांनी हे मंदिर बांधावयास आरंभ केला आणि गजेंद्र यशवंत नावाच्या व्यक्तीने ते बांधकाम पूर्ण केले. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाला काला दिला जातो. काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांच्या मुखांत घालतात आणि त्यानंतर वारीची सांगता होते. घरी गेल्यावर कानवल्यांचे (मुरडीव) भोजन करतात. इतके झाले म्हणजे यात्रा संपते.

विठ्ठलाच्या उपासनेत ह्या गोपाळकाल्याचे महत्त्व फार आहे. हा गोपाळकाला आणि वैदिक काळी पूषन् ह्या देवाच्या उपासनेसाठी बनविण्यात येणारा करंभ ह्यांच्यांत काही अभ्यासकांना एक निकटचे नाते जाणवलेले आहे. सातूचे पीठ आणि दही एकत्र करून हा करंभ तयार करीत. पंढरपूरचा विठ्ठलही ताकपिठाने संतुष्ट होतो. पंढरपूर येथील विठोबाच्या देवळाच्या पश्चिमेस एका बोळातल्या देवळात असलेला ताकपिठ्या विठोबा प्रसिद्धच आहे. पूषन् ह्या वैदिक देवाची दंतहीनता सोडली, तर त्याचे वर्णन गोपवेषधारी कृष्णाची आठवण करून देते. वृषभमुखाची काठी त्याच्या हातात असते. त्याने कांबळे परिधान केलेले असते. तो गाईगुरांची खिल्लारे राखतो  आणि गोपजनांना वाट दाखवतो .

॥ महाराष्ट्रातील संत ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.