ही गोष्ट संत गोरा कुंभार यांची आहे, ते रंगाने गोरे होते व त्यांचा व्यवसाय कुंभाराचा करत.
एके दिवशी गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत मग्न मडके बनविण्यासाठी माती तयार करत होते.
त्यांची बायको संताई पाणी आणण्यासाठी जात होती. त्यांनी मुलाला दोरीने बांधले व संत गोरा कुंभारांना मुलावर लक्ष्य ठेवण्यास सांगितले.
गोरा कुंभारांनी संताई हिचे बोलणे ऐकून घेतले व पुन्हा विठ्ठल भक्ती मध्ये लीन झाले.
त्यांचा लहान मुलगा त्याच्या वडिलांकडे पाहत होता आणि हळू हळू तो त्या ओल्या मातीकडे येत होता.
काही क्षणात मुलगा मातीमध्ये आला पण विठ्ठल भक्तीमध्ये लीन असलेल्या गोरा कुंभारांना याचे भान देखील नव्हते.
हळू हळू मुलाचे सर्व शरीर त्या मातीमध्ये आले. थोड्या वेळाने त्यांची पत्नी पाणी घेऊन परत येते.
परत आल्यानंतर त्यांनी पहिले मुलगा त्याच्या जागी नव्हता. त्यांना वाटले दोरी सुटली असेल व मुलगा जवळपास गेला असेल.
पण ती दोरी चिखलात गेलेली दिसली व तो चिखल गोरा कुंभार तुडवत होते. संताई ने पाहिले मुलाच्या खेळण्याचा थोडा भाग चिखलात रुतलेला होता.
संताई ने घाबरून संत गोरा कुंभार यांना विचारले माझे मूल कुठे आहे. मग्न भक्तीतून बाहेर येऊन संत गोरा कुंभार यांनी पहिले तर ते हैरान झाले.
त्यांना पश्चाताप झाला कारण त्यांचा मुलगा त्यांच्याच पायाखाली चिखलात तुडवला गेला होता. चिखल लालसर झाला होता.
संताई ने विचारले आपला मुलगा तुमच्या पायाखाली आहे याचे ध्यान पण नाही राहिले तुम्हाला? तुम्ही तुमच्या मुलाचाच जीव घेतला.
संताई ने टाहो फोडण्यास सुरवात केली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
"हे विठ्ठला काय घडले हे माझ्या कडून" असे म्हणत संत गोरा कुंभार यांनी डोक्याला हाथ लावला.
त्यावर संताई बोलली "कसले वडील आहेत तुम्ही, असली कसली भक्ती आहे तुमची काय भेटले तुम्हाला भक्ती करून,
तुमच्या भक्तीपायी माझा मुलगा गेला, तुम्हाला समजत नाही पण तुमच्या विठ्ठलाला देखील समजत नाही का?
का जीव घेतला विठ्ठलाने माझ्या मुलाचा, धिक्कार असो अश्या भक्तीचा आणि अश्या देवाचा."
विठ्ठलाबद्दल अशी अपमानकारक शब्द ऐकून संत गोरा कुंभार याना राग आला व त्यांनी आपल्या पत्नीला मारण्यासाठी हाथ उचलला तेवढ्यात संताई बोलल्या,
"मला हाथ लावू नका तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची शपथ आहे." हे शब्द ऐकून गोरा कुंभार यांनी त्यांचा हाथ थांबवला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली.
ज्या दिवसापासून संताई ने गोरा कुंभार यांना शपथ दिली त्यादिवसापासून त्यांनी संताई ला स्पर्श देखील केला नव्हता आणि संताई ने बनवलेले जेवण सुद्धा घेण्यास मनाई केली.
गोरा कुंभार त्या दिवसापासून खूप दुःखी राहू लागले, त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर देखील झाला ते कोणाशी जास्त बोलत नसत.
इकडे संताई ची पण तीच परिस्थिती होती मुलगा सोडून गेला आणि नवराही बोलत व स्पर्श देखील करत नव्हता.
संताई ने विचार केला जे व्हायचे ते झाले माझा मुलगा मला सोडून गेला व माझे पती देखील मला स्पर्श करत नाहीत.
कुळ पुढे वाढवण्यासाठी त्यांच्या वडिलांशी बोलून संत गोरा कुंभार यांचा विवाह त्यांच्या लहान बहिणीशी केला.
पण दुसऱ्या लग्नानंतरही संत गोरा कुंभार हे खूप दुःखी असत आणि दुसऱ्या पत्नीलाही ते स्पर्श करत नव्हते.
या काळजीने दोन्ही बहिणी खूप दुःखी होत्या.
एके दिवशी त्या दोघी संत गोरा कुंभार यांच्या दोन्ही बाजूला झोपल्या. संत गोरा कुंभार स्वप्नातही पांडुरंगाच्या भक्तीत मग्न होते.
स्वप्नात त्यांनी दोन्ही हात विठ्ठलाच्या भेटीसाठी पुढे केले आणि प्रत्यक्षात त्यांचे दोन्ही हाथ त्यांच्या दोन्ही बाजूला झोपलेल्या पत्नीला लागले.
या स्पर्शाने ते जागे झाले व त्यांना पश्चताप झाला, विठ्ठलाची शपथ मोडली हे सर्व या हातांमुळे झालं असे बोलत त्यांनी स्वतःचे हात मनगटापासून पुढे छाटून टाकले.
त्यांच्या कुटुंबावर पुन्हा एक नवीन संकट ओढवल.
पुढे काही दिवसांनी त्यांच्या घरी एक जोडपे काम मागण्यासाठी आले. त्यांचे नाव विठोबा होते.
राहण्यासाठी जागा आणि जेवण द्या बदल्यात ते सर्व त्यांच्या घरातील काम करतील.
"जशी पांडुरंगाची इच्छा" असे म्हणत संत गोरा कुंभार यांनी त्यांना राहण्याची परवानगी दिली.
पुढे विठोबाने संत गोरा कुंभाराचे सर्व काम सावरले, त्याने अत्यंत सुंदर असे खूप मडकी बनवली.
ज्याने संत गोरा कुंभार यांचा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू झाला.
त्याच दरम्यान पंढरपूर आषाढी वारी जवळ अली होती. विठोबाच्या सांगण्यावरून संत गोरा कुंभार विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर ला जाण्यासाठी तयार झाले.
वाटेवर एके ठिकाणी संत नामदेव काही वारकऱ्यांसोबत विठ्ठल कीर्तन करत होते. सर्व वारकरी दोन्ही हाताने टाळ्या वाजवत "जय जय राम कृष्ण हरी" म्हणत होते.
असे अतृप्त आणि अलौकिक वातावरण पाहून संत गोरा कुंभार ही उत्सुकतेने गाऊ लागले आणि टाळ्या वाजवण्यासाठी आपले हात उचलले
आणि तश्याच तुटलेल्या हातांनी टाळ्या वाजवू लागले.
अशी अदभूत भक्ती पाहून श्री विठ्ठलाच्या कृपेने पाहता पाहता संत गोरा कुंभार यांचे हात परत आले.
पांडुरंगाची अशी अद्वितीय लीला पाहून सर्व वारकरी आणि स्वतः संत गोरा कुंभार आश्चर्यचकित होऊन पाहू लागले.
कीर्तन संपल्यानंतर संत गोरा कुंभार यांना विठोबा कुठेच दिसत नव्हते. त्यांनी विठोबाला आणि त्याच्या पत्नीला आसपास खूप शोधले पण त्यांना ते जोडपे नाही सापडले.
निराश होऊन संत गोरा कुंभार पंढरपूर च्या दिशेने रवाना झाले.
पंढरपूर ला पोहचताच संत गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नी ने मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.
पांडुरंगाच्या मूर्ती मध्ये संत गोरा कुंभार यांना विठोबा चे दर्शन झाले. गोरा कुंभार यांना कळून चुकले कि त्यांना मदत करणारे दुसरे कोणी नसून
स्वतः श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी होत्या.
पांडुरंगाची लीला अद्वितीय आहे ते त्यांच्या भक्तांची काळजी नेहमी करतात.
॥ महाराष्ट्रातील संत ॥
Blogs
-
तुळशी महात्म्य
-
हार्टअटॅक अणि विठ्ठल
-
संत नामदेव आणि श्री विठ्ठल प्रसाद