॥ तुळशी महात्म्य ॥

आपुला तो एक देव करोनी घ्यावा।
तेणेविना जिवा सुख नोहे।

देवाला आपलेसे करण्यासाठी काय करावे लागेल? जर एखादी व्यक्ती आपल्यावर खूश व्हावी, असे वाटत असेल तर आपण काय करतो? त्या व्यक्तीला जे-जे आवडते, ते सगळे आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग देवाला आपलेसे करायचे असेल, तर त्याला आवडणारा प्रकार आपण केला पाहिजे. मग तुकाराम महाराजांना देवाला काय आवडते, असे विचारले असता, महाराज सांगतात –

आवडे देवाशी तो ऐका प्रकार।
नामाचा उच्चार रात्रंदिवस।।
तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा।
हृदय कळवळा वैष्णवांचा।

त्याच्या नामाचे चिंतन आणि गळय़ात तुळशीची माळ हीच गोष्ट देवाला आवडते. मग जर आपण देवाला आवडावे असे वाटत असेल, तर त्याला प्रिय असणारी तुळशीची माळ आपण धारण केली पाहिजे. म्हणूनच वारकरी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विधी करावे लागत नाहीत. दहा रुपयांची तुळशीची माळ आणि कपाळी बुक्का लावला की, झाला वारकरी. एकनाथ महाराज स्पष्ट शब्दांत सांगतात, बाबांनो आपण देवाला प्रिय व्हावे असे तुम्हाला वाटत असेल, तर इतर साधनांची खटापट करू नका. यावरील उपाय सांगताना नाथमहाराज म्हणतात –

तुळशीची करिता सेवा। होय देवा प्रिय तो।

इतकेच नव्हे तर त्याच्या पुढे एकनाथ महाराज सांगतात. अरे बाबांनो, देवाला आपलेसे करण्यासाठी यज्ञ-यागाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. यज्ञ केल्याचे पुण्य जर तुम्हाला पदरात पाडून घ्यायचे असेल, तर केवळ तुळशीचे पूजन करा –

देवा प्रिय तुळशी पान। नव्हे कारण यज्ञाचे॥

वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नामदेव महाराजही म्हणतात, भगवंताची कृपा होण्यासाठी प्रत्येक घराच्या दाराबाहेर तुळशीवृंदावन असायला हवे.

उभे वृंदावन जयाचिये द्वारी।
होय श्रीहरी प्रसन्न त्या॥
तुळशीचे रोप लावील आणोनी।
तया चक्रपाणी न विसंबे॥

ज्याच्या दारात तुळशीवृंदावन आहे, देव त्याला कधीही विसरत नाही. तुळशीची सेवा केल्याने पांडुरंगाची कृपादृष्टी सदैव राहते. तर पांडुरंगाने स्वत:ही तुळशीमाळ धारण केलेली आहे. म्हणूनच त्याचे रूप अतिशय गोजिरवाणे वाटते. या लोभस रूपाचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात-

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटेवरी ठेवोनिया॥
तुळशी हार गळा कासे पितांबर।
आवडे निरंतर हेची ध्यान॥

तुकाराम महाराजांनी तर तुळशीच्या पुढे इतर सर्व गोष्टी तुच्छ मानल्या. त्यांची ख्याती ऐकून एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला आले. महाराजांनी मांडलेले विचार ऐकल्यानंतर शिवाजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तुकाराम महाराजांसाठी सुवर्णाच्या मोहरांचा नजराणा पाठवला. खरे आजकालचा एखादा साधू असता तर त्याने लगेच ते धन स्वीकारले असते. महाराजांना, शिवरायांना आशीर्वाद दिले, परंतु शिवरायांचा तो नजराणा स्वीकारला नाही. ते म्हणाले – राजे या धनाची गरज माझ्यापेक्षा अधिक हिंदवी स्वराज्याला आहे आणि अशा धनाची आस माझ्यासारख्या माणसाला उरलेली नाही. आता सोन्या-रूप्यात मन रमत नाही-

सोने रूपे आम्हा मृतीके समान।
माणिक पाशान खडे जैसे॥

सोने-चांदी हे आम्हाला मातीप्रमाणे आहे आणि माणिक-मोती म्हणाल, तर ते माझ्यासाठी दगड-धोंडय़ांसारखे आहेत.
येर तुमचे वित्त धन। ते मज मृती के समान॥
हे तुम्ही जे धन पाठविलेले आहे, ते माझ्यासाठी मातीसमान आहे. शेवटी शिवाजी महाराजांनी विचारले, महाराज तुम्ही सुखी, आनंदी राहावे; म्हणूनच मी हा सुवर्णमुद्रांचा नजराणा पाठवला होता. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही सुखी व्हावे, आनंदी राहावे असे वाटत असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे. तुकाराम महाराज म्हणाले –

आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी।
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकादशी॥

आम्ही सुखी व्हावे, असे वाटत असेल तर तुळशीची माळ गळय़ात धारण करा आणि विठ्ठल नामाचा गजर करा. यावरून वारकरी संतांनी तुळशीला किती महत्त्व दिले आहे, हे लक्षात येते.

॥ महाराष्ट्रातील संत ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.