केवढी पवित्र जागा!
जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी. आनंद भौतिक पातळीवर असतो, समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर, लिंबू, मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ, साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते.
म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. पंढरपूरला गेल्यावर विठूमाऊलीच्या शेजारी न उभ्या राहता रुसून मागच्या बाजूला उभ्या राहिलेल्या रुक्मिणी आईसाहेबांना हात जोडून प्रेमळ भक्त विनंती करतो, "आई, तुम्ही आमच्या विठूरायावर रागावू नका. तुम्ही जोडीने छान दिसता. शिव-शक्ती एकवटली, की भक्ताला भक्तीचा समुद्र उचंबळल्यासारखा वाटतो." तसेच गृहमंदिरात पती-पत्नी मनाने एकरूप झाले, म्हणजे चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होते.
आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात.
" CONDUCT OF PARENTS IS EDUCATION OF CHILDREN..!"
मुले अनुकरणप्रिय असतात. आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा घराचा उकिरडा करतो आणि वास्तुतज्ज्ञ समस्येच्या मुळाशी न जाता फक्त अतार्किक, अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो आणि निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्चून मग पस्तावतात. अरे कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे तुम्हाला शक्य वाटते का आणि पटते का? तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू किती समाधानी ठेवू शकता. ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा.
रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात. माळ घेऊन जप करणारी वृद्ध माणसे आदरणीय वाटतात. मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आई-वडिलांशी खूप नम्रतेने वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावी. सुनेने सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा लावावा, की सून माहेरी गेली की सुनं सुनं वाटलं पाहिजे. घरात मेणबत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे. घरात महापूजा करावी. पवमानसूक्त किंवा लघुरुद्र करावा. सप्तशतीचा पाठ उत्तम. भोजनाने वेळी आनंदी वातावरण ठेवावे. पत्नी जेवली का विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे व वागावे. तिन्ही सांजेला रामरक्षा, हनुमान स्तोत्र, दत्तबावनी धूप टाकून म्हणावी. कुलदेवतेचे सणवार साजरे करावेत. एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्या. एकजण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे.
गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसे सारे शांत होईल. अग्नीत तेल ओतून वातावरण आणखी गरम होईल. चालतानाही घरात पाय आपटू नयेत. शांतपणे वस्तू हाताळाव्यात.
स्त्रियांच्या कपाळावरचा कुंकुम तिलक, पायातली जोडवी आणि गळ्यातले मंगळसूत्र ही स्त्रियांची सौभाग्याची फार मोठी शक्ती असते.
पुरुषांनीही घरात नीटनेटके राहावे.सतत फक्त बायकांनीच सदाफुलीसारखे टवटवीत राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही.
" अशी राहाते समाधानी वास्तु!
मोडतोड, दिशाबदल, कासव, पिरॅमिड, मंत्रांची कॅसेट वाजवत ठेवणे व स्वतः चकाट्या पिटत बसणे, हे सारे व्यर्थ आहे. तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न अन् समाधानी..!!