आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात.
घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.
ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
आज धनत्रयोदशीही आहे. धनत्रयोदशीला धनाची म्हणजे पैशांची पूजा केली जाते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते.
समुद्रामंथनाच्या वेळी धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला तो हा आजचा दिवस. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास `धन्वंतरी जयंती` असेही म्हणतात. धन्वंतरी ही आपल्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणारी देवता. जलौका, अमृतकलश, शंख, चक्र आदी धन्वंतरींच्या हातात असलेली साधने जीवनाला सुखी करण्यासाठी, शरीराच्या आरोग्याबरोबरच मानसिक व आध्यात्मिक पातळीवर आरोग्य नीट राहण्यासाठी मदत करणारी आहेत. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर देतात. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, अशी समजूत आहे.
॥ महाराष्ट्रातील संत ॥
Blogs
-
गुढीपाडव्याचे महत्त्व
-
नागपंचमी
-
रामनवमी