पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्या तालुक्यातले पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे.
पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.
या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात.
तीर्थक्षेत्र
पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात.
देऊळवाडा
पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली.
देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा गनिमी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मत हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेइश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात.
चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी' म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.
मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवऱ्या व सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा-खांबीचे दगडी खांब कोरीव असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करतना उजव्या हातास सन्त एकनाथ महाराजाचे पणजोबा सन्त भानुदास महाराजान्ची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकऱ्यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.
विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयानगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिसऱ्या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठलमंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे, की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ. मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी-कानडी सामांजस्याचा दुवा सांधला जातो
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई