तैसें आमुचेनि नांवें । अज्ञानाचें ज्ञानही नव्हे ।
आम्हांलागीं गुरुदेवें । आम्हीच केलों ॥ ८-१ ॥
परी आम्हा आम्ही आहों । तें इअसें पाहो जावों ।
तंव काय कीजे ठावो । लजिजे ऐसा ॥ ८-२ ॥
हा ठावोवरी गुरुरायें । नांदविलों उवायें ।
जे आम्ही न समाये । आम्हांमाजीं ॥ ८-३ ॥
अहो आत्मेपणीं न संटो । स्वसंविति न घसवटो ।
आंगीं लागलिया न फुटों । कैवल्यही ॥ ८-४ ॥
आमुची करवे गोठी । ते जालीचि नाहीं वाक्सृष्टी ।
आमुतें देखे दिठी । ते दिठीचि नव्हे ॥ ८-५ ॥
आमुतें करूनि विखो । भोगूं शके पारखो ।
तैं आमुतें न देखों । आम्हीपण ॥ ८-६ ॥
प्रगटो लपो न लाहो । येथें नाहीं नवलावो ।
परी कैसेनिही विपावो । असणयाचा ॥ ८-७ ॥
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
तेथ समोर होआवया । अज्ञानाचा पाडू कासया ।
केउते मेलिया माया । होऊं पाहिजे ॥ ८-९ ॥
अज्ञानचा प्रवर्तु । नाहीं जया गांवाआंतु ।
तेथें ज्ञानाची तरी मातु । कोण जाणे ? ॥ ८-१० ॥
राती म्हणोनि दिवे । पडती कीं लावावे ।
वांदुन सूर्यासवें । शिणणें होय ॥ ८-११ ॥
म्हणोन अज्ञान नाहीं । तेथेंचि गेलें ज्ञानही ।
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥ ८-१२ ॥
येहवीं तही ज्ञान अज्ञानानें । दोहींचि अभिधानें ।
अर्थाचेनि आनानें । विप्लावलीं ॥ ८-१३ ॥
जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें ।
तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ ८-१४ ॥
कां पाठी लाविला होये । तो दीपुचि वायां जाये ।
दिठी अंधरें पाहे । तैं तेचि वृथा ॥ ८-१५ ॥
तैसें निपटून जें नेणिजे । तें अज्ञान शब्दें बोलिजे ।
आतां सर्वही जेणें सुजे । तें अज्ञान कैसें ? ॥ ८-१६ ॥
ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें ।
ये दोहीं वांझौलें । दोन्ही जाली ॥ ८-१७ ॥
आणि जाणे तोचि नेणें । नेणे तोचि जाणे ।
आतां कें असे जिणें । ज्ञानाज्ञाना ? ॥ ८-१८ ॥
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।
उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे ज्ञानखंडन नाम अष्टम प्रकरणं संपूर्णम् ॥
संत ज्ञानेश्वर अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई