सत्ता प्रकाश सुख । या तिहीं तीं उणे लेख ।
जैसें विखपणेंचि विख । विखा नाहीं ॥ ५-१ ॥
कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक ।
द्राव गोडी पीयुख । पीयुखचि जेवीं ॥ ५-२ ॥
उजाळ दृति मार्दव । या तिन्हीं तिहीं उणीव ।
हें देखिजे सावेव । कापुरीं एकीं ॥ ५-३ ॥
आंगें कीर उजाळ । कीं उजाळ तोचि मवाळ ।
कीं दोन्ही ना परिमळ । मात्र जें ॥ ५-४ ॥
ऐसें एके कापुरपणीं । तिन्ही इये तिन्ही उणी ।
इयापरी आटणी । सत्तादिकांची ॥ ५-५ ॥
येहवीं सच्चिदानंदभेदें । चालिलीं तिन्ही पदें ।
परि तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें ॥ ५-६ ॥
सत्ताचि कीं सुख प्रकाशु । प्रकाशुचि सत्ता उल्हासु ।
हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ ५-७ ॥
शुक्लपक्षींच्या सोळा । दिवसा वाढती कळा ।
परि चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं ॥ ५-८ ॥
थेंबीं पडतां उदक । थेंबीं धरूं ये लेख ।
परि पडिला ठायीं उदक । वांचूनि आहे ? ॥ ५-९ ॥
तैसें असताचिया व्यावृत्ती । सत् म्हणों आलें श्रुति ।
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ ५-१० ॥
दुःखाचेनि सर्वनाशें । उरलें तें सुख ऐसें ।
निगदिलें निश्वासें । प्रभूचेनि ॥ ५-११ ॥
ऐसीं सदादि प्रतियोगियें । असदादि तिन्ही इयें ।
लोटितां जाली त्राये । सत्तादिकां ॥ ५-१२ ॥
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥
सूर्याचेनि प्रकशें । जें कांहीं जड आभासें ।
तेणें तो गिंवसें । सूर्यु कयी ? ॥ ५-१४ ॥
तेवीं जेणें तेजें । वाचेसि वाच्य सुजें ।
ते वाचा प्रकाशिजे । हें कें आहे ? ॥ ५-१५ ॥
विषो नाहीं कोण्हाहि । जया प्रमेयत्वचि नाहीं ।
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होय ॥ ५-१६ ॥
प्रमेयपरिच्छेदें । प्रमाणत्व नांदे ।
तें कायि स्वतःसिद्धें । वस्तूच्या ठायीं ? ॥ ५-१७ ॥
एवं वस्तूसि जाणों जातां । जाणणेंचि वस्तु तत्वता ।
मग जाणणें आणि जाणता । कैचें उरे ? ॥ १८ ॥
म्हणोनि सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ।
नव्हती हे शेष । विचाराचे ॥ ५-१९ ॥
ऐसेनि इयें प्रसिद्धे । चालिलीं सच्चिदानंद पदें ।
मग द्रष्ट्या स्वसंवादें । भेटती जेव्हां ॥ ५-२० ॥
ते वेळीं वरिसोनि मेघु । समुद्र होउनि वोघु ।
सरे दाऊनि मागु । राहे जैसा ॥ ५-२१ ॥
फळ विऊनि फुल सुके । फळनाशे रस पाके ।
तोहि रस उपखें । तृप्तिदानीं ॥ ५-२२ ॥
कां आहुति अग्नीआंतु । घालूनि वोसरे हातु ।
सुख चेवऊनि गीतु । उगा राहे ॥ ५-२३ ॥
नाना मुखा मुख दाऊनी । आरिसा जाय निगोनि ।
कां निदैलें चेववुनी । चेववितें जैसें ॥ ५-२४ ॥
तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा ।
तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥ ५-२५ ॥
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे ।
साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥ ५-२६ ॥
मग आपलियाकडे । मावितया से पडे ।
तैं लाजहिला जो आखुडे । मविते जैसें ॥ ५-२७ ॥
जैसी सत्ताचि स्वभावें । असत्ता तंव नव्हे ।
मा सत्तात्व संभवे । सत्तेसि कायि ? ॥ ५-२८ ॥
आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मात्रदशे ।
आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं इये ॥ ५-२९ ॥
नीद प्रबोधाच्या ठायीं । नसे तैसें जागणेंहि ।
तेवीं चिन्मात्रचि मा काई । चिन्मात्रीं ये ? ॥ ५-३० ॥
ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें ।
मा सुख हें गणणें । सुखासि काई ? ॥ ५-३१ ॥
म्हणोनि सदसदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें ।
सुखासुख जालें । कांहीं ना कीं ॥ ५-३२ ॥
आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचे कंचुक ।
सुखमात्रचि एक । स्वयें आथी ॥ ५-३३ ॥
वरी एकपणें गणिजे । तें गणितेनसीं ये दुजें ।
म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥ ५-३४ ॥
तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥
जैं प्रकृति डंकु अनुकरे । तैं प्रकृति डंकें अवतरे ।
मां डंकूचि तैं भरे । कोणकोणा ? ॥ ५-३६ ॥
तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ ५-३७ ॥
आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख ।
तेवीं नसोनी सुखासुख । सुखचि जें ॥ ५-३८ ॥
सर्व सिद्धांताचिया उजरिया । सांडोनिया निदसुरिया ।
आपुलिया हात चोरिया । आपणचि जो ॥ ५-३९ ॥
न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु ।
तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ ५-४० ॥
कां न सज्जितां विणा । तो नादु जो अबोलपणा ।
तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ ५-४१ ॥
नाना पुष्पाचिया उदरा । न येतां पुष्पसारा ।
आपणचि भंवरा । होआवे पडे ॥ ५-४२ ॥
नाना न रांधितां रससोये । ते गोडी पां कैसी आहे ।
हें पाहणें तें नोहे । आणिकाजोगें ॥ ५-४३ ॥
तैसें सुखपणा येवो । लाजे आपुलें सुख पावों ।
तें आणिकां चाखों सुवों । येईल काईं ? ॥ ५-४४ ॥
दिहाचिया दुपारीं । चांदु जैसा अंबरीं ।
तें असणें चांदाचिवरी । जाणावें कीं ॥ ५-४५ ॥
रूप नाहीं तैं लावण्य । अंग नुठी तैं तारुण्य ।
क्रिया न फुटे तैं पुण्य । कैसें असे ॥ ५-४६ ॥
जैं मनाचा अंकूर नुपजे । तेथिलेनि मकरध्वजें ।
तोचि हन माजे । तरीचि घडे ॥ ५-४७ ॥
कां वाद्यविशेषाची सृष्टी । जैं जन्म नेघे दृष्टी ।
तैं नादु ऐशी गोष्टी । नादाचि जोगी ॥ ५-४८ ॥
नाना काष्ठाचिया विटाळा । वोसरलिया अनळा ।
लाग्णें तैं केवळा । अंगासीचि ॥ ५-४९ ॥
दर्पणाचेनि नियमें । वीणचि मुखप्रमे ।
आणिती तेचि वर्में । वर्मती येणें ॥ ५-५० ॥
न पेरितां पीक जोडे । तें मुडाचि आहे रोकडें ।
ऐसिया सोई उघडें । बोलणें हें ॥ ५-५१ ॥
एवं विशेष सामान्य । दोहीं नातळे चैतन्य ।
तें भोगिजे अनन्य । तेणेंसीं सदा ॥ ५-५२ ॥
आतां यावरी जे बोलणें । तें येणेंचि बोलें शहाणें ।
जें मौनाचेंही निपटणें । पिऊनि गेलें ॥ ५-५३ ॥
एवं प्रमाणें अप्रमाण- । पण केलें प्रमाण ।
दृष्टांतीं वाइली आण । दिसावयाची ॥ ५-५४ ॥
अंगाचिया अनुपपत्ति । आटलिया उपपत्ती ।
येथें उठली पांती । लक्षणाची ॥ ५-५५ ॥
उपाय मागील पाय । घेऊन झाले वाय ।
प्रतीति सांडिली सोय । प्रत्ययाची ॥ ५-५६ ॥
येथें निर्धारेंसी विचारु । निमोनि झाला साचारु ।
स्वामीच्या संकटी शूरु । सुभटू जैसा ॥ ५-५७ ॥
नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिला ।
नुसुधेपणें थोंटावला । अनुभउ जेथे ॥ ५-५८ ॥
भिंगाचिया चडळा । पदरांचा पुंज वेगळा ।
करितां जैसा निफाळा । आंगाचा होय ॥ ५-५९ ॥
कां गजबजला उबा । पांघुरणें केळीचा गाभा ।
सांडी तेव्हेळीं उभा । कैंचा कीजे ? ॥ ५-६० ॥
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
अनुभवो हा ठाववरी । आपुलीचि अवसरी ।
तेथें अक्षरांची हारी । वाईल काई ? ॥ ५-६२ ॥
कां परेसी पडे मिठी । तेथें नादासाळु नुठी ।
मा वावरिजैल ओंठीं । हें कें आहे ? ॥ ५-६३ ॥
चेइलियाही पाठीं । चेवणयाच्या गोठी ।
कां धाला बैसें पाठीं । रंधनाच्या ? ॥ ५-६४ ॥
उदैजलिया दिवसपती । तैं कीं दिवे सेजे येती ।
वांचुनि पिकला शेतीं । सुइजताती नांगर काई ? ॥ ५-६५ ॥
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।
आतां निरूपणाचें भोज । वोळगे जही ॥ ५-६६ ॥
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें ।
मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें ।
जही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे सच्चिदानंदपदत्रयविवरणं नाम पंचम प्रकरणं संपूर्णम् ॥
संत ज्ञानेश्वर अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई