बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ? ॥ ६-१ ॥
पहातें आरिसा पाहे । तेथें कांहींचि नवल नव्हे ।
परि दर्पणें येणें होये । न पाहतें , पाहतें ॥ ६-२ ॥
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।
येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ६-३ ॥
आपण तंव खपुष्प । परि फळ ते जगद्रूप ।
शब्द मवीतैं उमप । कोण आहे ? ॥ ६-४ ॥
विधिनिषेधांचिया वाटा । दाविता हाचि दिवटा ।
बंधमोक्ष कळिकटा । शिष्टु हाचि ॥ ६-५ ॥
हा अविद्येचा आंगीं पडे । तैं नाथिलें ऐसें विरूढे ।
न लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ ६-६ ॥
शुद्ध शिवाच्या शरीरीं । कुमारु हा जिउ भरी ।
जेवीं आंगें पंचाक्षरी । तेवींचि बोलु ॥ ६-७ ॥
जिउ देहें बांधला । तो बोलें एके सुटला ।
आत्मा बोलें भेटला । आपणयां ॥ ६-८ ॥
दिवसातें उगो गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला ।
म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हे ॥ ६-९ ॥
जे प्रवृत्ति आअणि निवृत्ति । विरुद्धा ह्या हातु धरिती ।
मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥ ६-१० ॥
सहाय आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे ।
गोमटे काय शब्दाचें । येकैक वानूं ॥ ६-११ ॥
किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।
परी ययाही संबंधु । नाहीं येथें ॥ ६-१२ ॥
आत्मया बोलाचें । कांहींचि उपेगा न वचे ।
स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ? ॥ ६-१३ ॥
आठवे कां विसरे । विषो होऊनि अवतरे ।
तरी वस्तूसी वस्तु दुसरें । असेना कीं ॥ ६-१४ ॥
आपण आपणयातें । आठवी विसरे केउतें ? ।
काय जीभ जिभितें । चाखे न चाखे ? ॥ ६-१५ ॥
जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? ।
स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥
सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? ।
तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥
एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? ।
म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥
आणिक येक शब्दें । काज कीर भलें साधे ।
परि धिंवसा न बंधे । विचारु येथें ॥ ६-१९ ॥
कां जे बोलें अविद्याअ नाशे । मग आत्मेनि आत्मा भासे ।
हें म्हणतखेवो पिसें । आलेंचि कीं ॥ ६-२० ॥
सूर्यो राति पां मारील । मा आपणया उदो करील ।
हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ ६-२१ ॥
चेईलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ? ।
कीं चेईलें चेवो बैसें । ऐसें चेणें आहे ? ॥ ६-२२ ॥
म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाही निरुती ।
नाहीं आत्मा आत्मस्थिति । रिगे ऐसा ॥ ६-२३ ॥
अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीर जाउपें ।
मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा ? ॥ ६-२४ ॥
इंद्रधनुष्या सितें । कवण धनवईन लाविजेतें ।
तें दिसें तैसें होतें । साच जरी ? ॥ ६-२५ ॥
अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ।
तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥ ६-२६ ॥
साहे बोलाची बळघी । ऐसी अविद्या असे जगीं ।
तरी जाळुं ना कां आगी । गंधर्वनगरें ? ॥ ६-२७ ॥
नातरी दीपाचिये सोये । आंधारु कीर न साहे ।
तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ? ॥ ६-२८ ॥
नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु ।
तेव्हढाहि उद्वसु । उद्यमु पडे ॥ ६-२९ ॥
जेथें साउली न पडे । तेथें नाही जेणें पाडें ।
मा पडे तेथें तेव्हडे । नाहींच की ॥ ६-३० ॥
दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें ।
तेविं अविद्याकाळीं सतुकें । अविद्या नाहीं ॥ ६-३१ ॥
वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया ।
नागवें नागविलिया । विशेषु काई ॥ ६-३२ ॥
मनोरथाचें परियळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ ।
परि उपवासावेगळ । आनु आथी ? ॥ ६-३३ ॥
मृगजळ जेथ नुमंडे । तेथ असे पां कोरडें ।
माउमंडे तेथें जोडे । वोल्हांसु काई ? ॥ ६-३४ ॥
हें दिसे तैसें असे । तरी चित्रीचेनि पाउसें ।
वोल्हावतु कां मानुसें । आगरा तळीं ॥ ६-३५ ॥
कालवूनि आंधारें । लिहों येती अक्षरें ।
तरी मसीचिया बोरबारें । कां सिणावें ? ॥ ६-३६ ॥
आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ? ।
तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेईं ॥ ६-३७ ॥
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे ।
हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥ ६-३८ ॥
आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण ।
आपुल्या अभावीं आपण । साधीतसे ॥ ६-३९ ॥
का हीच जरी आहे । तरी निर्द्धारु कां न साहे ? ।
वरी घटाभावें भोये । अंकित दिसे ? ॥ ६-४० ॥
अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।
सुर्या आंगीं तमा । जयापरी ॥ ६-४१ ॥
हे अविद्या तरी मायावी । परि मायावीपणचि लपवी ।
साचा आली अभावी । आपुला हे ॥ ६-४२ ॥
बहुतापरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसीं ।
आतां बोलू हातवसी । कवणापरी ॥ ६-४३ ॥
साउलियेतें साबळें । हालयां भोय आदळे ।
कीं हालेनि अंतराळें । थोंटावे हातु ॥ ६-४४ ॥
कां मृगजळाचा पानीं । गगनाचा अलिंगनीं ।
नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाचा ॥ ६-४५ ॥
उठावला वोथरे तवंका । तो सुनाथ पडे असिका ।
अविद्या नाशीं तर्का । तैसें होय ॥ ६-४६ ॥
ऐसी अविद्या नासावी । वाहेल जो जीवीं ।
तेणें साली काढावी । आकाशाची ॥ ६-४७ ॥
तेणें शेळीगळां दुहावीं । गुडघां वास पाहावी ।
वाळवोनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ ६-४८ ॥
जांभई वांटूनि रसु । तेणें काढावा बहुवसू ।
कालवूनि आळसू । मोदळा पाजावा । ६-४९ ॥
तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ।
वारयाचे तांथु । वळु सुखें ॥ ६-५० ॥
तो बागुलातें मारू । प्रतिबिंब खोळे भरू ।
तळहातींचे विंचरू । केंस सुखें ॥ ६-५१ ॥
घटाचें नाहींपण फोडू । गगनाची फुलें तोडू ।
सशाचें मोडू । शिंग सुखें ॥ ६-५२ ॥
तो कापुराची मसी करू । रत्नदीपीं काजळ धरू ।
वांजेचें लेंकरूं । [अरणु सुखें ॥ ६-५३ ॥
तो अंवसेनेचि सुधाकरें । पोसू पाताळीची चकोरें ।
मृगजळींचीं जळचरें । गाळूं सुखें ॥ ६-५४ ॥
अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ।
आतां काई नाशावें । शब्दें येणें ॥ ६-५५ ॥
नाहीं तयाचे नाशें । शब्द न ये प्रमाणदशे ।
अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ६-५६ ॥
अविद्येची नाहीं जाती । तेथें नाहीं म्हणतया युक्ती ।
जेवी दुपारीं कां वाती । आंगणींचिया ॥ ६-५७ ॥
न पेरितां शेती । जे कीं सवगणिया जाती ।
तयां लाजेपरौति । जोडी आहे ? ॥ ६-५८ ॥
खवणियाच्या आंगा । जेणें केला वळघा ।
तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ६-५९ ॥
पाणियावरी वरखु । होता कें असे विशेखु ।
अविद्यानाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥ ६-६० ॥
माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिघे ।
तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥ ६-६१ ॥
गगनाची रससोये । जीभ जैं आरोगु जाये ।
मग रसना हें होये । आडनांव कीं ॥ ६-६२ ॥
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण कां शोभे ।
खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥ ६-६३ ॥
स्थूळ सूक्ष्म कवण येकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ।
परि रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥ ६-६४ ॥
दिठी पाहतां काय न फावे । परि निदेतें तंव न देखवे ।
चेता ते न संभवे । म्हणोनियां ॥ ६-६५ ॥
चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ।
जरि दिहाचि चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६-६६ ॥
नुसुधियेचि साचा । मुका होय वाचरुकाचा ।
अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥ ६-६७ ॥
तैसीं अविद्येसन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें ।
उठलींच निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६-६८ ॥
अंवसे आला सुधाकरु । न करीच काय अंधकारु ? ।
अविद्यानाशीं विचारु । तैसा होय ॥ ६-६९ ॥
नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघनें ।
निमालेनि नयनें । पाहणाचि अंधु ॥ ६-७० ॥
कैसीही वस्तु नसे । जैं शब्दाचा अर्थ हों बैसे ।
तैं निरर्थकपणें नासे । शब्दहि थिता ॥ ६-७१ ॥
आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणो काई ।
परी ते नाशितां कांहीं । नुरेची शब्दाचें ॥ ६-७२ ॥
यालागिं अविद्येचिया मोहरां । उठलियाहि विचारा ।
आंगाचाची संसारा । होऊनि ठेला ॥ ६-७३ ॥
म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ।
हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥ ६-७४ ॥
आणि आत्मा हन आत्मया । दाऊनी बोलु महिमेया ।
येईल हें साविया । विरुद्धचि ॥ ६-७५ ॥
आपणया आपणपेंसी । लागलें लग्न कवणे देशीं ।
कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ? ॥ ६-७६ ॥
गगन आपणया निघे ? । सिंधु आपणा रिघे ? ।
तळहात काय वळघे । आपणयां ? ॥ ६-७७ ॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । फळ आपणया फळें ? ।
परिमळु परिमळें । घेपता ये ? ॥ ६-७८ ॥
चराचरा पाणी पाजणी । करूं येईल येके क्षणीं ।
परि पाणियासि पाणि । पाजवे कायी ? ॥ ६-७९ ॥
साठीं तिशा दिवसां । माजीं एखादा ऐसा ।
जे सूर्यासीच सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ६-८० ॥
कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील ।
वांचूनि आगी लावील । आगीसि काई ? ॥ ६-८१ ॥
आपणपें आपणया । दर्पणेवीण धात्रेया ।
समोर होआवया । ठाकी आहे ? ॥ ६-८२ ॥
दिठी दिठीतें रिघों पाहे ? । रुचि रुचीतें चाखों सुये ? ।
कीं चेतया चेतऊं ये ? । हें नाहींच कीं ॥ ६-८३ ॥
चंदन चंदना लावी ? । रंगु रंगपणा रावी ।
मोतींपण मोतीं लेववी । ऐसें कैंचें ? ॥ ६-८४ ॥
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ।
रसपणा बुडी ते रसीं । तें कें जोडे ? ॥ ६-८५ ॥
आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा ।
परि चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई ? ॥ ६-८६ ॥
तैसा आत्मराजु तंव । ज्ञानमात्रचि भरींव ।
आतां ज्ञानें ज्ञानासि खेंव । कैसें दीजे ? ॥ ६-८७ ॥
आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणों नेणे ।
डोळ्या आपुलें पाहाणें । दुवाड जैसें ॥ ६-८८ ॥
आरसा आपुलिये । आंगीं आपण पाहे ।
तरी जाणणें जाणों लाहे । आपणयातें ॥ ६-८९ ॥
दिगंतापैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे ।
मा तियेका तियेचें । आंग फुटे ? ॥ ६-९० ॥
रसवृत्तीसी उगाणें । घेऊनि जिव्हाग्र शाहाणें ।
परि कायी कीजे नेणे । आपणापें चाखों ॥ ६-९१ ॥
तरि जिव्हे काई आपलें । चाखणें हन ठेलें ? ।
तैसे नव्हे संचलें । तेंचि तेकीं ॥ ६-९२ ॥
तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु ।
आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥ ६-९३ ॥
कोणाही प्रमाणाचेनि हातें । वस्तु घे ना नेघे आपणयातें ।
जो स्वयेंचि आइतें । घेणें ना न घेणें ॥ ६-९४ ॥
म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदऊनि शब्द शोभे ।
येईल ऐसा न लभे । उमसुं घेवों ॥ ६-९५ ॥
एवं माध्यान्हींची दिवी । तम धाडी ना दिवो दावी ।
तैसी उपभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ६-९६ ॥
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें ।
आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥
ऐसा उभय पक्षीं । बोला न लाहोनि नखी ।
हारपला प्रळयोदकीं । वोघु जैसा ॥ ६-९८ ॥
आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठाईं ।
अर्थता तरि नाहीं । निपटुनियां ॥ ६-९९ ॥
बागुल आला म्हणितें । बोलणें जैसें रितें ।
कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥ ६-१०० ॥
तैसीं निरर्थकें जल्पें । होउनियां सपडपें ।
शोभती जैसें लेपे । रंगावरी ॥ ६-१०१ ॥
एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।
साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥ ६-१०२ ॥
या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला ।
अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥ ६-१०३ ॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे शब्दखंडनं नाम षष्ठम प्रकरणं संपूर्णम् ॥
संत ज्ञानेश्वर अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई