सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर
आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार
अग, ग ..... विंचू चावला
देवा रे देवा ..... विंचू चावला
आता काय मी करू ..... विंचू चावला
अग, ग ..... विंचू चावला
अग बया, बया ..... विंचू चावला
अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो
महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी ?
काम, क्रोध विंचू चावला
तम घाम अंगासी आला
त्याने माझा प्राण चालिला
मनुष्य इंगळी अति दारुण
((हा, हा, म्हणजे अति 'दारू' नं)
दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.
दारूण म्हणजे भयंकर.
(भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का ?)
अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
(अति भयंकर म्हणजे ?)
खूप भयंकर.
(अन् खूप भयंकर म्हणजे ?)
मायंदाळ भयंकर.
(अन् मायंदाळ भयंकर म्हणजे ?)
तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
(बापरे !))
मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं .....
((तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.
गंगीचा इथे काय संबंध ?
(मग त्या रंगीनं.)
कुणाचाही संबंध नाही.)
तिनं म्हणजे त्या इंगळीनं
(महाराज इंगळी म्हणजे ?) ..... मोठा विंचू !
(अंदाजे केवढा ?) ..... तुझ्याएवढा !
मनुष्य इंगळी अति दारूण
मज नांगा मारिला तिनं
सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची
या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा
(तंबाखु खाणं मागे सारा)
नाही, नाही, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा
तमोगुण म्हणजे काय ?
गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,
पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
सत्वगुण लावा अंगारा, अन् विंचू इंगळी उतरे झरझरा
सत्य उतारा येऊन (आला का ?)
अवघा सारिला तमोगुण
किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने
पुंडलीक वरदा (हरी विठ्ठल)
श्री ज्ञानदेव (तुकाराम)
पंढरीनाथ महाराज की जय
संत एकनाथ अभंग
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई