संत जनाबाई यांचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. संत जनाबाई यांचा एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.
गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे संत जनाबाई यांचे गाव होय. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयतां नियमितपणे पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलंनी संत जनाबाईला संत नामदेव यांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.
संत नामदेव यांच्या सहवासात संत जनाबाई यांनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानेश्वर-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.
‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेव यांच्यामुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी म्हटले आहे. गौर्या-शेण्या वेचतांना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.
संत जनाबाई यांच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाई यांच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथ यांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.
संत जनाबाई यांची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाई यांच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेव यांच्यावरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी असलेला उत्कट भाव, संत चोखामेळा यांचे भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाई यांच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे संत जनाबाई यांच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाई यांनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाई यांचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.
संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत गोरा कुंभार
Blogs
-
Ekadashi 2022
-
वैकुंठ चतुर्दशी
-
पंढरपूर पालखी