संत तुकाराम

॥ संत तुकाराम माहिती ॥

संत तुकाराम

मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

जन्म : इ.स. १५९८, देहू, महाराष्ट्र

निर्वाण : इ.स. १६५०, देहू, महाराष्ट्र

संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय

गुरू : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर

शिष्य : निळोबा बहिणाबाई भगवानबाबा

भाषा : मराठी

साहित्यरचना : संत तुकाराम यांची गाथा (पाच हजारांवरअभंग)

कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक

संबंधित तीर्थक्षेत्रे : देहू

व्यवसाय : वाणी

वडील : बोल्होबा अंबिले

आई : कनकाई

पत्नी : आवळाबाई

संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते.

पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा संत तुकाराम यांचा आराध्यदेव होता. संत तुकाराम यांना वारकरी 'जगदगुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.

संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त संत तुकाराम यांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. 'अभंग म्हटला की तो फक्त संत तुकाराम यांचाच ' (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकाराम यांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता 'अभंग ' आहे, वाढतेच आहे.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते.त् यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. संत तुकाराम यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. संत तुकाराम यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी संत तुकाराम यांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता.

संत तुकाराम यांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.

संत तुकाराम यांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.

संत तुकाराम यांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना संत तुकाराम यांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी संत तुकाराम यांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.

फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम यांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला.

महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे ज्यू बहुजनांच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. देव-धर्म प्रथेपुढे समाज गांजलेला होता. अंधश्रद्धेने सारा समाज पोखरला होता. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - संत ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आला. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञानज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे.

संत ज्ञानेश्वर यांच्यानंतर जनार्दन स्वामी, संत एकनाथ महाराज, संत नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.

॥ संत तुकाराम अभंग ॥

whatsApp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.